सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
रामटेकडी परिसरात चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान एका सराईत गुन्हेगाराने सहायक पोलीस निरीक्षकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. यात आरोपीच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला, तर त्याचा साथीदार सुरुवातीला पसार झाला होता. नंतर गुन्हे शाखेने त्यालाही ताब्यात घेतले.
जखमी आरोपीचे नाव करणसिंग रजपूतसिंग दुधाणी (वय २९, रा. रामटेकडी, हडपसर) असे असून त्याच्यावर घरफोडी, चोरी, जबरी चोरी आणि दरोड्यासह सुमारे ३० गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन दिवसांपूर्वी बाणेर परिसरात झालेल्या घरफोडीच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित चोरीच्या दुचाकीवरून फिरताना आढळले होते. दुचाकीच्या क्रमांकाच्या आधारे तपास केला असता ती दुचाकी आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे तसेच त्यामध्ये जीपीएस यंत्रणा असल्याचे निष्पन्न झाले.
तांत्रिक तपासातून संबंधित दुचाकी रामटेकडी परिसरात असल्याचे समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रायकर यांच्या पथकाने रविवारी सकाळी सापळा रचला. रामटेकडीतील गल्ली क्रमांक पाचमध्ये करणसिंग दुधाणी व त्याचा साथीदार चोरीच्या दुचाकीवरून येताना दिसताच पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, शरण येण्याऐवजी करणसिंगने थेट रायकर यांच्यावर चाकूने हल्ला केला. रायकर यांनी प्रसंगावधान राखून वार हातावर झेलला आणि स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळी झाडली. गोळी लागताच करणसिंग खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, करणसिंग दुधाणी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो सध्या जामिनावर बाहेर होता. वानवडी पोलिस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असून ११ जून रोजी त्याची नियमित हजेरी घेण्यात आली होती.
या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान घरफोडीच्या आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
