सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
चांदर गावात तीव्र पाणी टंचाईमुळे पाण्यासाठी विहिरीवर गेलेल्या एका महिलेचा विहिरीत पडून गंभीर अपघात झाला. मंगळवारी (दि. १६ जून) ही घटना घडली असून या दुर्घटनेत महिलेचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आशा अनिल सांगळे (वय ३४, रा. चांदर, ता. राजगड) या पाणी आणण्यासाठी गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील विहिरीवर गेल्या होत्या. विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. संबंधित विहिरीला कोणताही संरक्षण कट्टा नसून सुरक्षितरीत्या पाणी काढण्याची सुविधाही उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
घटना घडल्यानंतर सोबत असलेल्या महिलांनी तत्काळ गावकऱ्यांना व नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर आशा सांगळे यांना उपचारासाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
चांदर हे सुमारे २५ ते ३० घरांची वस्ती असलेले गाव असून गावातील नळपाणी पुरवठा योजना बंद असून पाणीटंचाईच्या समस्येमुळे महिलांना जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी व विहिरीवर आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती पंचायत समिती व ग्राम विकास अधिकारी यांना दिली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे, यावर प्रशासन काय उपाय योजना करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
