सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज मोरगाव मुख्य चौकात गुरुवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले. माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय ढोले यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले.
सध्या दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि मनमानी चा जाहीर निषेध करण्यात आला. मोरगाव मुख्य चौकात सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या उपोषणात मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग होता. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि परीक्षा प्रक्रियेतील विश्वासार्हता कायम राखण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
उपोषणस्थळी विविध सामाजिक गटातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना नैतिक पाठिंबा दिला. युवक, विद्यार्थी, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशी भावना व्यक्त केली.
या आंदोलनात दत्तात्रेय ढोले यांच्यासह गावातील जेष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच पोपटराव तावरे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश तावरे समिर गायकवाड संजय गायकवाड इत्यादी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार होणे अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास अबाधित राहण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असून, यासाठीच दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून मोरगावात एकदिवसीय उपोषण आयोजित करण्यात आले आहे.
सुपे पोलिस ठाण्याच्या वतीने आंदोलन स्थळी चोख बंदोबस्त दिसत होता. दिवसभर शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मोरगाव परिसरात सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. विविध स्तरातील नागरिकांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
