सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दिवंगत लोकनेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांना सभासद, कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरातून ३१९ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले, तर सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांसाठी १३ हजार फळझाडांच्या वाटपाला प्रारंभ करण्यात आला, असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कारखान्याच्या वतीने रक्तदान शिबिर, अनुदान स्वरूपात आंबा, नारळ, पेरू, चिकू, लिंबू आणि जांभूळ या विविध फळझाडांचे वाटप तसेच अजितदादांना प्रिय असलेल्या सोनचाफा वृक्षाचे "अजितवृक्ष" असे नामकरण करून त्याचे वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
रक्तदान शिबिरात कारखान्याचे व सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या शिबिरातून एकूण ३१९ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. फळझाड वाटप उपक्रमाबाबत माहिती देताना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, चालू वर्षी सुमारे २० हजार फळझाडांची नोंदणी झाली असून त्यापैकी १३ हजार फळझाडांच्या वाटपास सुरुवात झाली आहे. हा उपक्रम अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सन २०१८ पासून सातत्याने राबविण्यात येत असून आजअखेर कारखान्याने सभासदांना तब्बल ९७ हजार फळझाडांचे वाटप केले आहे.
पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारे हे उपक्रम भविष्यातही स्वरूपात सुरू राहतील.
