बारामती l NEET 2026 ची भारतातील अव्वल श्रावणी कुदळेचा सोमेश्वरनगरमध्ये सत्कार; विद्यार्थ्यांना दिला यशाचा मंत्र

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विवेकानंद अभ्यासिका, समर्थ कॉम्प्युटर करंजेपूल आणि साद संवाद स्वच्छता ग्रुप, वाणेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने NEET 2026 परीक्षेत संपूर्ण भारतात पाचवा, तर मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या श्रावणी कृष्णा कुदळे हिचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. 
         यावेळी तिला मार्गदर्शन करणारे श्री.भुजबळ, श्री. येळे तसेच तिच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदीप जगताप होते. यावेळी पी. बी. जगताप, रोहिणी सावंत, श्री.गोलांडे, प्रा. दरेकर आणि प्राजक्ता सोळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्कारानंतर सोमेश्वरनगर परिसरातील दहावी व अकरावीतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये श्रावणी कुदळे, श्री. भुजबळ आणि श्री.येळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना श्रावणी कुदळे म्हणाली की, 'मोबाईलपासून शक्य तितके दूर राहून, शिक्षकांवर पूर्ण विश्वास ठेवत त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने नियमित ऑफलाइन अभ्यास केल्यामुळे हे यश मिळवता आले.
भुजबळ सरांनी स्वयंप्रेरणा, प्रामाणिक प्रयत्न आणि स्वयंअध्ययन हे NEET सारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याचे सांगितले. विद्यार्थी आणि पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची तिघांनीही स्वतःच्या अनुभवाच्या आधारे समर्पक उत्तरे देत उपस्थितांना प्रेरित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साद संवादचे समन्वयक डी. वाय. जगताप यांनी केले. स्वागत गणेश सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन शशिकांत जेधे यांनी मानले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
To Top