Pune Crime | १ कोटी रुपये लुबाडण्याच्या प्रकरणात मोठी कारवाई; पुणे ग्रामीण पोलिस दलातील २ कर्मचाऱ्यांचे निलंबन

सोमेश्वर रिपोर्टर live
पुणे : प्रतिनिधी 
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुण्यातील व्यावसायिकाचे तब्बल १ कोटी रुपये लुबाडण्याच्या प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून, खेड शिवापूर पोलिस चौकीतील पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजित मेस्त्री यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पुणे शहरातील नवले पुलाजवळ एका व्यावसायिकाचे १ कोटी रुपये लुबाडण्याच्या प्रयत्नाशी संबंधित प्रकरणात या दोघांचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी नऱ्हे पोलिस ठाण्यात दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या घटनेमुळे पोलिस दलातील शिस्त व जबाबदारीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, चौकशी अहवालानंतर आणखी काही कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Tags
To Top