सुपे परगणा l 'स्मार्ट सुपे'साठी लोकसहभाग हाच विकासाचा मंत्र : किरण तावरे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे गावाची 'स्मार्ट व्हिलेज' म्हणून निवड झाल्याने गावाची वाटचाल आधुनिक आणि सर्वांगीण विकासाकडे होत आहे. मात्र, कोणतीही विकास योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असून गावाच्या विकासासाठी लोकसहभागाला पर्याय नाही असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी केले.
       सुपे ( ता. बारामती ) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या स्थापनेला ३३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त इलेक्ट्रिक घंटागाडीचे लोकार्पण, सार्वजनिक व घरगुती कचराकुंड्यांचे तसेच कापडी पिशव्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून किरण तावरे बोलत होते.
       कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, गटविकास अधिकारी किशोर माने, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, बी. के. हिरवे, शौकत कोतवाल, अशोक लोणकर, अशोक बसाळे, सुयश जगताप, मोहित खळदे आणि संजय दरेकर आदी मान्यवरांनी ग्रामविकास, स्वच्छता आणि लोकसहभाग याविषयी मार्गदर्शन केले.
       मागील वर्षापासून 'कचरामुक्त गाव' अभियानांतर्गत ग्रामस्थांमध्ये सातत्याने जनजागृती करण्यात येत असून गावात घंटागाडी नियमित फिरत असल्याची माहिती सरपंच तुषार हिरवे यांनी प्रास्ताविकात दिली. यावेळी ओला व सुका कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नव्याने उपलब्ध झालेल्या इलेक्ट्रिक घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले.
       याप्रसंगी पंचायत समिती सदस्या उज्वला खैरे, कालवा सल्लागार समिती सदस्य पोपट खैरे, उपसरपंच पूजा निकाळजे, शंकर शेंडगे, शफीक बागवान, विलास वाघचौरे, नयना जगताप, विशाल चांदगुडे, वैष्णवी बारवकर, अश्विनी जाधव, अश्विनी सकट, मयुरी बारवकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरपंच तुषार हिरवे यांनी केले. ग्रा. पं. सदस्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर सूत्रसंचालन सतीश बोरावके यांनी केले.
To Top