Phaltan Breaking l लोकवस्तीजवळ स्फोटकांचा साठा; फलटण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : बरडमध्ये जिलेटिन स्फोटकांनी भरलेला ट्रक जप्त

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
फलटण : गणेश पवार
फलटण ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बरड हद्दीतील रांजणी पुनर्वसन परिसरात कारवाई करत जिलेटीन स्फोटकांनी भरलेला ट्रक जप्त केला. या कारवाईत सुमारे २४ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी गुप्त बातमीदारामार्फत रांजणी पुनर्वसन येथील बंद मराठी शाळेच्या मैदानात दोन दिवसांपासून स्फोटकांनी भरलेला बंदिस्त ट्रक उभा असल्याची माहिती मिळाली होती.
 त्यानुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, इतर पोलीस कर्मचारी व पंचांसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.तेथे एमएच ११ सीएच २५५५ क्रमांकाचा टाटा कंपनीचा बंदिस्त दहा चाकी ट्रक आढळून आला. ट्रकजवळ उपस्थित असलेल्या हेमराज महावीर जाट याची चौकशी केली असता ट्रकमध्ये स्फोटकांच्या कांड्यांचे बॉक्स असल्याचे त्याने सांगितले. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये Ecoprime X 83 mm चे ५०० बॉक्स तसेच Superpower 90 X चे ४ बॉक्स आढळून आले.
पोलिसांनी स्फोटकांचा साठा, ट्रक आणि रासायनिक विश्लेषणासाठी आवश्यक नमुने असा एकूण २४.७२ लाख रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. सुरक्षेच्या दृष्टीने जप्त केलेला स्फोटक साठा सुरक्षित मॅगझीनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. चौकशीदरम्यान हा माल शंकरलाल बेनीराम जाटरा बिलिया का रास्ता भीलवाडा राज्य राजस्थान सध्या राहणार बरड यांचा असल्याचे सांगण्यात आले. Ecoprime स्फोटकांपैकी काही माल वितरित करण्यात आल्याचे सांगितले गेले, मात्र Superpower स्फोटकांबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. लोकवस्तीच्या परिसरात स्फोटकांनी भरलेला ट्रक निष्काळजीपणे उभा करून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी शंकरलाल बेनीराम जाट व हेमराज महावीर जाट रा बिलिया का रास्ता भीलवाडा राज्य राजस्थान सध्या राहणार बरड यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.
To Top