सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत राज्यातील सुमारे १७ लाख शेतकऱ्यांना तब्बल १३ हजार ५०० कोटी रुपयांचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. कर्जमुक्त लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालये आणि विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आल्याने महा-ई-सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.
दरम्यान, महा-ई-सेवा केंद्रांवर सतत सर्व्हर बंद पडत असल्याने आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून अनेकांची कामे रखडत आहेत. कर्जमुक्तीच्या यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी, "कर्जमाफीचा आनंद आहे; पण आधार प्रमाणीकरणासाठी दिवसभर थांबावे लागत आहे. दिवस वाया जात असला तरी पर्याय नाही," अशा भावना व्यक्त केल्या.
एका महा-ई-सेवा केंद्र चालकाने सांगितले की, "सतत सर्व्हर बंद पडत असल्याने दिवसाला अवघ्या १० ते १५ शेतकऱ्यांचेच आधार प्रमाणीकरण करता येत आहे. शेतकऱ्यांची अडचण आम्हालाही समजते; मात्र सर्व्हरच्या समस्येमुळे आम्ही हतबल आहोत." याबाबत एका विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सचिवांनी सांगितले की, आधार प्रमाणीकरणाची मुदत ३१ जुलै पर्यंत असल्याची माहिती आहे. मात्र, सध्याच्या सर्व्हर समस्येमुळे अनेक शेतकरी मुदतीत प्रमाणीकरण करू शकणार नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने आधार प्रमाणीकरणासाठी मुदतवाढ जाहीर करावी, तसेच सहकार आयुक्तांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी आणि संबंधितांकडून होत आहे.
