सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : पंढरीनाथ शिंदे
पुरंदर तालुक्यातील जेजुरी शहरातील दवणेमळा परिसरात शनिवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली. घराजवळील सेफ्टी टँकमध्ये पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मजुरीसाठी जेजुरीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिव अविनाश हितापूर (वय १ वर्षे ६ महिने) हा शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घराबाहेर खेळत होता. काही वेळाने तो अचानक दिसेनासा झाल्याने कुटुंबीयांची घाबरगुंडी उडाली. नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. याचदरम्यान जेजुरी पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
शोध सुरू असताना घराजवळील सेफ्टी टँकमधील पाण्यावर बुडबुडे दिसल्याने नागरिकांना संशय आला. त्यानंतर टँकमधील पाणी बाहेर काढण्यात आले असता शिव त्यामध्ये आढळून आला. गंभीर अवस्थेत त्याला तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शिवचे कुटुंब मूळचे हरसगुडी, तालुका चिंचोली, जिल्हा कलबुर्गी (कर्नाटक) येथील असून, रोजगाराच्या शोधात काही दिवसांपूर्वी ते जेजुरी येथे आले होते. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबावर या दुर्घटनेमुळे मोठे संकट ओढवले आहे.
या घटनेनंतर दवणेमळा परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी चिमुकल्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. जेजुरी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
