Purandar News | साकुर्डे विद्यालयात तानाजी झेंडे यांच्या सेवापूर्तीचा गौरव सोहळा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
मातोश्री जिजाई सोपानराव जाधव माध्यमिक विद्यालय, साकुर्डे (ता. पुरंदर) येथील उपशिक्षक तथा शिक्षक नेते तानाजी झेंडे हे ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त संस्था, विद्यालय आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष उदयराव जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पोशाख देऊन तानाजी झेंडे व त्यांच्या सौभाग्यवतींचा सत्कार करण्यात आला.
इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ शिक्षक म्हणून ओळख असलेल्या तानाजी झेंडे यांनी आपल्या सेवाकाळात तालुका व जिल्हास्तरीय विविध प्रशिक्षणांमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्य केले. तसेच पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिव म्हणून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
साकुर्डे हायस्कूलचे अनेक विद्यार्थी आज प्रशासन, बँकिंग, पोलीस, शिक्षण, सहकार आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले. माजी विद्यार्थी तसेच विविध मान्यवरांनी झेंडे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
यावेळी जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, जि. प. सदस्या रुपालीताई झेंडे, माजी उपपोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर झेंडे, विविध संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील नामवंत माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश कामथे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर दरेकर व मधुसूदन जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे यांनी मानले.
To Top