Baramati Crime l माळेगाव पोलिसांची धडक कारवाई; ४.४६ लाखांची दारू व वाहने जप्त, दोघे ताब्यात

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
माळेगाव : प्रतिनिधी
अवैध दारू वाहतुकीविरोधात माळेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत देशी दारू, गावठी हातभट्टीची दारू तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली कार व मोटारसायकल असा एकूण ४ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार दानेवाडी (ता. श्रीगोंदा) येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करणारी भट्टीही उद्ध्वस्त करण्यात आली.
ही कारवाई २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास माळेगाव पोलिसांनी कऱ्हावागज चौकात केली. माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, शेखर श्रीरंग पवार (वय २४, रा. राजापूर-दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) हा मोटारसायकलवरून गावठी हातभट्टीची दारू घेऊन येणार असून ती कैलास शंकर गव्हाणे (वय ३६, रा. माळेगाव बु., ता. बारामती) याला विक्रीसाठी देणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी कऱ्हावागज चौकात सापळा रचला. काही वेळाने माळेगावकडून मारुती सुझुकी अल्टो कार क्रमांक MH-12-KT-0341 आली. कारमधून एक इसम खाली उतरला. त्याचवेळी मोटारसायकलवरील इसमाने काळ्या रंगाचा ड्रम कारमध्ये ठेवला. संशय आल्याने पोलिसांनी दोन्ही इसमांना ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान देशी दारू टँगो पंच कंपनीचे ३३ बॉक्स, किंमत १ लाख १५ हजार ५०० रुपये, गावठी हातभट्टीची तयार दारू असलेले ३० लिटर क्षमतेचे दोन ड्रम, किंमत ६ हजार रुपये, ३ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी अल्टो कार आणि २५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ४ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल जालिंदर वाघमारे यांच्या फिर्यादीवरून माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१५/२०२६ अन्वये बीएनएस कलम १२३, ३(५) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ६५(अ)(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत.
दरम्यान, आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दानेवाडी येथे जाऊन गावठी हातभट्टीची दारू तयार करणारी भट्टी शोधून ती उद्ध्वस्त केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे व त्यांच्या पथकाने केली.
To Top