Baramati News l धनराज पिसाळ आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा; ग्रामस्थांचा रास्ता रोको

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव 
 धनराज जयवंत पिसाळ यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी या परिसरातील विविध संघटना तसेच माळवाडी, फोंडवाडा, काऱ्हाटी व जळगाव परिसरातील ग्रामस्थांनी फोंडवाडा पाटी येथे बारामती–मोरगाव मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
      दूध संघाचे संचालक सतीश हरिश्चंद्र पिसाळ यांच्यासह गुन्ह्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. धनराज जयवंत पिसाळ यांनी दि. ३ जुलै २०२६ रोजी राहत्या घरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. संपत्तीच्या वादातून सतीश हरिश्चंद्र पिसाळ यांच्यासह अन्य आठ जणांकडून मानसिक त्रास व छळ झाल्याने धनराज यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी संबंधितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      मात्र, गुन्हा दाखल होऊन सुमारे चाळीस दिवस उलटूनही सर्व आरोपींवर ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ‘गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट कसे?’ असा सवाल करत आंदोलकांनी पोलिस प्रशासनाच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. आरोपींच्या अटकेसाठी कुटुंबीय व ग्रामस्थांनी सातत्याने पोलिसांकडे पाठपुरावा केला; मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्याने अखेर रस्त्यावर उतरावे लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
     या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, अशा मागणीचे लेखी निवेदन पोलिसांना देण्यात आले. तसेच धनराज पिसाळ यांच्या कुटुंबातील धनश्री जयवंत पिसाळ व आशा जयवंत पिसाळ यांच्या जीविताला आरोपींकडून धोका असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून, संबंधित कुटुंबाला तातडीने पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.

       दरम्यान, सुपे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी सांगितले की, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मांजरी पोलिस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने सुपे पोलिस ठाण्याने दोन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखा व सुपे पोलिस ठाण्याची पथके शोध घेत असून, लवकरच उर्वरित आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती नवसरे यांनी दिली.
To Top