सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सदोबाचीवाडी, ता. बारामती स्वातंत्र्यदिनानिमित्त सदोबाचीवाडी येथे कृषिदूतांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय, मैदानी व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात अंगणवाडीतील चिमुकल्यांसह प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कला, कौशल्य व क्रीडागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
विविध मनोरंजनात्मक खेळ, शालेय उपक्रम आणि क्रीडा स्पर्धांमुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांसह सहभागी मुलांना कृषिदूतांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व, देशभक्ती, शिस्त, संघभावना आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व कृषिदूतांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषिदूत देवदत्त पुरंदरे, निमिश हिंगणे, निखिल नाळे, ईश्वर कुंभार, राहुल आकिवाटे, ऋषी पाठक, व्यंकटेश इमानी यांच्यासह शाळेतील शिक्षिका, विद्यार्थी व ग्रामस्थांनी सहकार्य केले. उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.
