सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
बाजारवाडीत रोहिडा पर्यटन निवासाचे उद्घाटन राज्यात पर्यटनात भोर तालुका अग्रेसर असून तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे असल्याने राज्यातील पर्यटक पर्यटनासाठी वर्षभर भोर तालुक्यात येत असतात.पर्यटनस्थळे पर्यटकांनी खुलून जातात. भोर तालुक्यातील पर्यटनामुळे पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत असते. दरम्यान वीसगाव खोऱ्यातील बाजारवाडी ता.भोर येथील रोहडा पर्यटक निवासामुळे बहुतांशी पर्यटकांच्या निवासाची सोय होणार असून पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार असल्याने भोरच्या पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे मत माजी आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.
वीसगाव खोऱ्यातील बाजारवाडी येथे रोहिडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी उभारलेल्या रोहिडा पर्यटक निवासाच्या उद्घाटन प्रसंगी रविवार दि. १६ माजी आमदार थोपटे बोलत होते. पर्यटक निवास एक कोटींच्या निधीतून उभारण्यात आले आहे. निवासस्थानातील लाईट फिटिंग व फर्निचरसाठी गोदरेज ऑफलाईन्सने सीएसआर फंडातून १२ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
यावेळी जि. प. सदस्य स्वरूपा थोपटे, माजी जि.प.सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समिती सदस्य सुषमा चव्हाण, गीतांजली आंबवले, सुरेश राजीवडे, उत्तम थोपटे, संपत दरेकर, प्रफुल मोरे, संग्राम घोरपडे, अंकुश खंडागळे, रणधीर खोपडे, उपसरपंच उत्तम खोपडे, बाळासाहेब शिंदे, मोहन गुरव, विकास शिंदे, राजेंद्र शिंदे, तुषार शिंदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार बोलताना पुढे म्हणाले पुढील काळात भोर तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तर तालुक्यातील डोंगररागांच्या कुशीत वसलेल्या पर्यटन स्थळांवर राज्यातून येणाऱ्या पर्यटकांच्या निवासासाठी ठीक ठिकाणच्या पर्यटन स्थळांवर निवासस्थाने उभारणार आहे.
पर्यटक निवासामुळे पर्यटकांमध्ये वाढ
भोर तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे असून पर्यटन स्थळांवर वर्षभर पर्यटक मोठी गर्दी करीत असतात. त्यातीलच पर्यटन स्थळ रोहिडेश्वर किल्ला असून किल्ल्यावरून तालुक्याच्या पूर्णता परिसरातील हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा तसेच निसर्ग सौंदर्य पर्यटकांना पहावयास मिळत असल्याने रोहिडेश्वर किल्ल्यावर शनिवार,रविवार सुट्टीचे औचित्य साधून पर्यटक मोठी गर्दी करीत असतात. त्यातच माजी आमदार यांच्या विशेष प्रयत्नातून पर्यटक निवास उभारल्याने पर्यटकांच्या निवासाची सोय झाली आहे. पर्यटकांमध्ये मोठी वाढ झाली आहे असे विकास सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब शिंदे,उपसरपंच उत्तम खोपडे यांनी सांगितले.
