पुणे l ‘इन्स्टा’वरील कमेंट-लाईकच्या वादातून बारामतीच्या रीलस्टारवर कोयत्याने हल्ला; जीवे मारण्याचा प्रयत्न, ७ जण अटकेत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुण्यात सोशल मीडियावरील कमेंट आणि लाईकच्या वादातून बारामतीच्या रीलस्टारवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डेक्कन परिसरातील कॅफे फ्लाईंग जिप्सी येथे अथर्व जगताप रा. पणदरे ता. बारामती या रीलस्टारच्या गळ्यावर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात अथर्व जगताप गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना १५ ऑगस्टच्या पहाटे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन रीलस्टारमध्ये इन्स्टाग्रामवरील कमेंट आणि लाईकच्या कारणावरून वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. कॅफे फ्लाईंग जिप्सी येथे झालेल्या वादातून अथर्व जगताप याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात अथर्वच्या गळ्यावर गंभीर वार झाल्याने तो जखमी झाला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. जखमी अथर्वला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन तरुणींसह सात जणांना अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोशल मीडियावरील क्षुल्लक वादाचे रूपांतर थेट प्राणघातक हल्ल्यात झाल्याने या घटनेने सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण, सहभागी आरोपींची भूमिका आणि हल्ल्यात वापरण्यात आलेल्या शस्त्राबाबत डेक्कन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
To Top