Phaltan Breaking l अल्पवयीन मुलीचा बालविवाह; लैंगिक अत्याचारातून मुलाचा जन्म, पाच जणांविरुद्ध लोणंद पोलीसात गुन्हा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
लोणंद : प्रतिनिधी 
फलटण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा तिच्या इच्छेविरुद्ध विवाह लावून देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचारानंतर मुलगी गर्भवती राहिली असून दि. १४ ऑगस्ट रोजी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिची सिझेरियनद्वारे प्रसूती झाली. तिने एका मुलाला जन्म दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ सप्टेंबर २०२५ ते दि. १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्या इच्छेविरुद्ध तिचा विवाह लावून देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्या पतीनेही ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याशी वेळोवेळी लैंगिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली.
दरम्यान, दि. १४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.१० वाजता सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिची सिझेरियनद्वारे प्रसूती झाली. वैद्यकीय तपासणीदरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालयाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि एमएलसी जबाबाच्या आधारे लोणंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(२)(m), ३(५), बालविवाह प्रतिबंधक अधिनियमातील कलम ९, ११ तसेच पोक्सो अधिनियमातील कलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पूर्वीच्या भारतीय दंड विधानातील कलम ३७६(२)(N), ३४ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम व पोक्सो अधिनियमातील संबंधित कलमांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच फलटण विभागाचे उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी रात्री १०.१६ वाजता घटनास्थळी भेट दिली. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक हेगडे तपास करीत असून आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देणे आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या या गंभीर प्रकारामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
To Top