Baramati News l श्रीरामाचे रक्षण करण्याचा सर्वस्वी अधिकार ठाकरे सेनेलाच : खासदार संजय राऊत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव 
अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी हजारो कारसेवकांनी बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून अयोध्येत राम मंदिर उभे राहिले. त्यामुळे श्रीरामाचे रक्षण करण्याचा सर्वस्वी अधिकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच असल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले.
      मोरगाव (ता. बारामती) येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हनुमंत भापकर यांच्यावतीने रामरक्षा पठण व महाआरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राऊत बोलत होते.
         राऊत म्हणाले, “बाबरी मशीद पाडण्यात माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे,” असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठामपणे सांगितले होते. आज भाजप आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे. ज्या श्रीरामाच्या नावावर त्यांनी सत्ता मिळवली, त्याच रामाची चौदाशे कोटींची तिजोरी लुटत आहेत. लूट तुम्ही करता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी राज्यभर रामरक्षा आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला असून, पुणे, नाशिक, नागपूरनंतर बारामतीतही आंदोलन करण्यात आले. रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
         “मोदी सरकारच्या खासगी खात्यात साडेदहा हजार कोटी रुपये आहेत, तरीही रामाची चौदाशे कोटींची तिजोरी लुटली जात आहे. ‘भगवान को डरना चाहिये’, मात्र आता देवच भाजपला घाबरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपमुळे राम पुन्हा वनवासात जाण्याची वेळ येऊ नये,” अशी टीका राऊत यांनी केली.
       श्रीरामाचे रक्षण करण्याची जबाबदारी आणि अधिकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला असल्याचे ठामपणे सांगितले. मात्र मिंध्ये सेनेला नाही असा उपरोधीक टोला राऊत यांनी लगावला. 
To Top