बारामती l सांगोल्यात ‘मिशन प्रॉफिट’चा जागर; औदुंबर खैरे यांचा 'आदर्श दुधउत्पादक' म्हणून विशेष गौरव

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन दुग्ध व्यवसाय अधिक नफ्याचा बनविण्याच्या उद्देशाने प्रोग्रेसिव्ह ब्रीडर्स फार्मर असोसिएशन (PBFA) यांच्या वतीने सांगोला येथील सूर्योदय मॉलमध्ये ‘मिशन प्रॉफिट’ दूध उत्पादक मार्गदर्शन शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास सोलापूर, बारामती व परिसरातील शेकडो पशुपालक आणि दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय व प्रगतशील कामगिरी केल्याबद्दल बारामती तालुक्यातील वाकी येथील औदुंबर डेअरी फार्मचे संचालक औदुंबर राजकुमार खैरे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ‘सूर्योदय दूध’चे विशेष स्मृतिचिन्ह (ट्रॉफी) देऊन त्यांना गौरविण्यात आले. औदुंबर खैरे यांनी आधुनिक तंत्रज्ञान व पद्धतींचा वापर करून आपल्या डेअरी फार्मची प्रगत वाटचाल केली आहे. त्यांच्या या कार्याचा आदर्श परिसरातील तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
मेळाव्यात ॲडव्हान्स एन्झाईम टेक्नॉलॉजी लि., मुंबईचे आंतरराष्ट्रीय विक्री व्यवस्थापक डॉ. शैलेश मदने यांनी जनावरांचे आरोग्य, संतुलित आहार नियोजन तसेच दुधाची गुणवत्ता वाढविण्याबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.
PBFA चे अध्यक्ष संजय सालगुडे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात ‘मिशन प्रॉफिट’ या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. पारंपरिक पद्धतींसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून दुग्ध व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास सूर्योदय दूध, सांगोलाचे चेअरमन डॉ. बंडोपंत लवटे, PBFAचे सचिव रामनाथ वदक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच असोसिएशनचे खजिनदार वामन गायकवाड, सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. राजू पांढरे, उपाध्यक्ष महावीर साळवे, सौरभ मासाळ आणि राजकुमार दळवे यांच्यासह विविध पदाधिकारी व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी औदुंबर राजकुमार खैरे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील प्रगतीस शुभेच्छा दिल्या. मेळाव्यास उपस्थित शेतकरी बांधवांसाठी भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
To Top