Satara Breaking l कराडमध्ये मोबाईल शॉपी फोडली; कारमधून आलेल्या चौघांचा ३० लाखांवर डल्ला; ११५ मोबाईल लंपास

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
कराड : प्रतिनिधी 
कराड शहरात कारमधून आलेल्या चौघा चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडून सुमारे ३० लाख रुपयांचे तब्बल ११५ मोबाईल संच चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री मोहिते हॉस्पिटलजवळील एस. एस. मोबाईल शॉपीत ही चोरी झाली.
मोबाईल शॉपीचे मालक सचिन रामचंद्र पाटील यांनी याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी प्रथम दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. त्यानंतर दुकानाचे सेंटर लॉक आणि शटर तोडून आत प्रवेश केला. काउंटर आणि डिस्प्लेमध्ये ठेवलेले विविध कंपन्यांचे सुमारे ११५ मोबाईल संच चोरून चौघांनी कारमधून पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांची कार, त्यांच्या हालचाली आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
दरम्यान, दरोड्याची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झाले. पथकाने दुकानाची पाहणी करून आवश्यक नमुने आणि पुरावे संकलित केले असून, त्या आधारे तपासाला दिशा देण्याचे काम सुरू आहे. 
या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे करीत आहेत.
To Top