Satara Crime | बँक खाती व एटीएम कार्ड गोळा करून सायबर फसवणूक; चौघांची टोळी जेरबंद

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
सर्वसामान्य नागरिकांना पैशांचे आणि कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती, एटीएम कार्ड आणि सिम कार्ड गोळा करून सायबर फसवणूक करणाऱ्या चौघांच्या टोळीला सातारा सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोरेगाव येथे सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत मोबाईल, एटीएम कार्ड्स, रोख रक्कम आणि बुलेटसह सुमारे २ लाख ३४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार सातारा सायबर पोलीस बनावट बँक खात्यांचा मागोवा घेत होते. कोरेगाव परिसरातील काही तरुण कमिशनचे आमिष दाखवून नागरिकांकडून बँक खाती आणि सिम कार्ड गोळा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळी आणि त्यांच्या पथकाने कोरेगाव येथील तीळगंगा नदी पुलाजवळ डमी खातेदार पाठवून सापळा रचला. एटीएम कार्ड स्वीकारण्यासाठी आलेल्या एका संशयिताला रंगेहात पकडल्यानंतर चौकशीतून त्याच्या आणखी तीन साथीदारांना अटक करण्यात आली.
तपासात संशयितांनी पुरवलेल्या बँक खात्यांवर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटकसह विविध राज्यांमध्ये ३५ हून अधिक सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयित मुख्य सायबर सूत्रधारांच्या संपर्कात टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून असल्याचेही तपासात समोर आले आहे.
कारवाईत पाच मोबाईल, आठ एटीएम कार्ड्स, अतिरिक्त सिम कार्ड्स, आधार व पॅन कार्ड, ३३ हजार ६५० रुपयांची रोख रक्कम आणि एक बुलेट असा एकूण २ लाख ३४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, कोणत्याही कमिशनच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे किंवा नातेवाईकांचे बँक खाते, एटीएम कार्ड अथवा सिम कार्ड अनोळखी व्यक्तींना देऊ नये. अन्यथा नकळत सायबर गुन्हेगारीचे भागीदार बनून कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. असा प्रकार आढळल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी केले आहे.
To Top