Baramati News | होळ येथे रावे विद्यार्थिनींकडून हर्बल चहाचे प्रात्यक्षिक; बचत गट महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमातील विद्यार्थिनींनी ग्रामपंचायत होळ येथे मूल्यवर्धित उत्पादन उपक्रमांतर्गत हर्बल चहा तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमाला महिला बचत गटांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
प्रात्यक्षिकादरम्यान पेरूची पाने, गवती चहा, आले, गोकर्णीची फुले, वेलची, लवंग, तुळशीची पाने आणि गूळ या नैसर्गिक व औषधी गुणधर्म असलेल्या घटकांचा वापर करून हर्बल चहा तयार करण्यात आला. उपस्थित महिलांना हर्बल चहा तयार करण्याची पद्धत, त्याचे पोषणमूल्य, आरोग्यदायी फायदे तसेच व्यावसायिक महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
विद्यार्थिनींनी हर्बल चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास, शरीराला ऊर्जा व ताजेतवानेपणा मिळण्यास तसेच घसा खवखवणे व खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान महिला बचत गटांच्या सदस्यांनी हर्बल चहा तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहून विद्यार्थिनींशी संवाद साधला. स्थानिक पातळीवर उपलब्ध औषधी वनस्पतींचा वापर करून मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास ग्रामीण महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मार्गदर्शनही विद्यार्थिनींनी केले.

या उपक्रमासाठी प्रा. सौ. पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन रावे विद्यार्थिनी सानिका चौघुले, अनुष्का दाभोळे, तन्वी जगताप, संचीता कांबळे, राशी खुस्पे, तेजल राऊत आणि अमृता सातपुते यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. ग्रामस्थ आणि महिला बचत गटांच्या सदस्यांनी विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातही अशा उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
To Top