सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील महापारेषणच्या कामथडी येथील १३२ केव्ही वीज उपकेंद्रात रविवार दि. २ रात्री भीषण अपघात घडला.३३ केव्ही कोंढणपूर लाईनवर काम सुरू असताना विजेचा धक्का बसल्याने विद्युत सहाय्यक रेवती पैठणे,पहारेकरी हनुमंत राजपुरे हे दोघे गंभीर जखमी झाले.सध्या त्यांच्यावर नसरापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक माहितीनुसार रविवार दि.२ रात्री सुमारे ९ च्या सुमारास ३३ केव्ही कोंढणपूर लाईनवर वर्क परमिट घेतल्यानंतर साईड अर्थिंगसाठी अर्थ रॉड टाकण्याचे काम सुरू होते.यावेळी अर्थ रॉड ३३ केव्हीच्या इंडक्शन झोनमध्ये गेल्याने अचानक स्पार्क झाला.
या स्पार्कमुळे विद्युत सहाय्यक रेवती पैठणे आणि बॅटरी पकडण्यासाठी सोबत असलेले पहारेकरी हनुमंत राजपुरे यांना जोरदार विजेचा धक्का बसला. दोघेही गंभीररीत्या भाजले.अपघाताची माहिती मिळताच उपकेंद्रावरील ऑपरेटर यांनी तत्काळ दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांना नसरापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.
या घटनेची माहिती कामथडी उपकेंद्राच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी राजगड पोलिस ठाण्यात दिली.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
