सुपे परगणा l श्रावणी सोमवारनिमित्त कोरेश्वर मंदिर गजबजले; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव 
कारखेलच्या कोरेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी
बारामती तालुक्यातील कारखेल अंतर्गत मात्र कोळोली, देऊळगाव रसाळ आणि कारखेल या तीन गावांच्या सीमेलगत निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री कोरेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सकाळपासूनच भाविकांनी दर्शन व महाप्रसादासाठी मोठी गर्दी केली होती.
    कोरेश्वर मंदिर हे भगवान शिवाच्या आराधनेचे श्रद्धास्थान असून, घनदाट वनराई, हिरवाई आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण भाविकांसह पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
 श्रावणातील प्रत्येक सोमवारी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मंदिरात महाभिषेक करण्यात येतो. भाविकांनी श्रद्धेने भगवान कोरेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला.
      महाशिवरात्रीसह विविध धार्मिक सणांच्या काळातही मंदिरात विशेष पूजा, अभिषेक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिर परिसरातील नैसर्गिक सौंदर्याबरोबरच येथे विविध पक्षी व वन्यजीवांचे दर्शनही घडते. त्यामुळे धार्मिक पर्यटनासोबतच निसर्गप्रेमींसाठीही हा परिसर आकर्षणाचे ठिकाण बनला आहे.
      पुण्यापासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या निसर्गरम्य कोरेश्वर मंदिर परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास भाविक व पर्यटकांची संख्या वाढून परिसराच्या विकासाला आणखी चालना मिळू शकते.
To Top