सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे (बिगर नगरपरिषद क्षेत्र) येथील प्रारूप विकास योजनेवर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींची नियोजन समितीसमोर सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम २८(३) अन्वये ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
त्यामुळे आरक्षणनिहाय सुनावणी दि. ३, ४ आणि ७ सप्टेंबर रोजी सुपे येथील ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात होणार आहे. संबंधित हरकतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायात अधिकारी सतीश बोरावके, सरपंच तुषार हिरवे यांनी केले आहे. या सुनावणीमध्ये ट्रक टर्मिनस, पार्किंग, उद्यान, शासकीय वापर, वसतिगृह, दफनभूमी, कत्तलखाना, जलशुद्धीकरण प्रकल्प, बाजारपेठा, बसस्थानक, शैक्षणिक संकुल तसेच विविध रुंदीच्या प्रस्तावित रस्त्यांबाबतच्या आरक्षणांवर सुनावणी होणार आहे.
जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व अर्थ समितीचे सभापती विवेक प्रतापराव वळसे पाटील, बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती दिपाली हुलावळे, स्थायी समिती सदस्य रुपाली झेंडे यांचा समितीमध्ये समावेश आहे. तसेच सेवानिवृत्त सहसंचालक (नगर रचना) मधुकर देवडे, वास्तुविशारद संतोष रासकर आणि सेवानिवृत्त नगर रचनाकार औदुंबर नेर्लेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीच्या उपस्थितीत हरकतदारांची सुनावणी होणार आहे.
तसेच या नियोजन समितीने सुनावणी पूर्ण करून दोन महिन्यांत जिल्हा परिषदेकडे अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे जाहिर नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
