सुपे परगणा l शेतकऱ्याची चेकद्वारे फसवणूक पडली महागात; गूळ उत्पादकास चार महिन्यांची सक्तमजुरी, चार लाख रुपये दंड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव 
सुपे शेतातील ऊस तोडून नेऊन त्याचे देयक देण्यासाठी दिलेले धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने वटले नाहीत. धनादेशाची रक्कम मागणी करूनही ती न दिल्याने दाखल करण्यात आलेल्या फौजदारी प्रकरणात बारामती येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट क्रमांक ३) प्रशांत पी. काळे यांनी अर्णव गूळ उद्योग समूहाचे मालक सोमनाथ विश्वनाथ रूपनवर यांना दोषी ठरवून चार महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच चार लाख रुपयांचा दंड ठोठावून दंडाची संपूर्ण रक्कम फिर्यादी शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.
            या प्रकरणातील फिर्यादी रविंद्र ज्ञानदेव चांदगुडे (रा. दंडवाडी, सुपे) यांनी आरोपीकडे ऊस दिला होता. ऊसाच्या देयकापोटी आरोपीने १२ जून २०२३ व ६ जुलै २०२३ रोजी धनादेश दिले होते. मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने दोन्ही धनादेश वटले नाहीत. त्याबाबत बँकेने २१ जुलै २०२३ रोजी अहवाल दिला.
त्यानंतर फिर्यादीने आरोपीला २ ऑगस्ट २०२३ रोजी कायदेशीर नोटीस पाठवून धनादेशातील रक्कम देण्याची मागणी केली. ही नोटीस आरोपीला ५ ऑगस्ट २०२३ रोजी मिळाल्याचे न्यायालयाने नोंदविले. नोटीस मिळूनही आरोपीने धनादेशाची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे फिर्यादीने १९ सप्टेंबर २०२३ रोजी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली.
        सुनावणी दरम्यान धनादेश, बँकेचे अहवाल, नोटीस व इतर कागदोपत्री पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. आरोपीने धनादेशाची रक्कम न दिल्याचे तसेच नोटीस मिळूनही रक्कम अदा केली नसल्याचे पुराव्यांतून सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे आरोपीने पराक्रम्य संलेख अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अन्वये गुन्हा केल्याचे सिद्ध झाले.

        फिर्यादी पक्षातर्फे वकीलांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राहय धरत आरोपीस चार महिन्यांची सक्तमजुरी व चार लाख रुपये दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अधिक एक महिन्याची साधी कैद भोगावी लागणार आहे. दंडाची चार लाख रुपयांची संपूर्ण रक्कम अपील कालावधीनंतर फिर्यादी शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आरोपीचा जामीन मुचलका रद्द करण्यात आला असून, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३७-अ अंतर्गत २५ हजार रुपयांचे बंधपत्र व जामीनदाराचे बंधपत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यावेळी फिर्यादीतर्फे सुपे येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. चंद्रशेखर रमेशराव जगताप यांनी काम पाहिले.  
To Top