Phaltan News l साखरवाडीत बंदी असलेल्या नायलॉन मांज्याचा सर्रास वापर; दुचाकीस्वाराचा थोडक्यात बचाव

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
साखरवाडी : प्रतिनिधी 
पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चायनीज व नायलॉन मांज्यावर प्रशासनाने बंदी घातलेली असतानाही साखरवाडी परिसरात त्याचा सर्रास वापर सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. साऊंड सिस्टीम लावून वाजतगाजत बंदी असलेल्या मांज्याने पतंग उडवला जात असल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साखरवाडी बाजारपेठेतून एक दुचाकीस्वार जात असताना अचानक बारीक मांजा त्याच्या दुचाकीसमोर आला. वेळीच मांजा लक्षात आल्याने त्याने सावधपणे दुचाकी थांबवली. त्यामुळे संभाव्य गंभीर दुर्घटना टळली. त्यानंतर संबंधित नागरिकाने रस्त्यावर पडलेला मांजा स्वतः काढून बाजूला केला.
चायनीज व नायलॉन मांजा अत्यंत बारीक आणि धारदार असल्याने दुचाकीस्वार, पादचारी तसेच पक्ष्यांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो. विशेषतः गर्दीच्या बाजारपेठेत रस्त्यावर पडलेला किंवा विजेच्या तारांमध्ये अडकलेला मांजा गंभीर दुर्घटनेचे कारण ठरू शकतो.
बंदी असतानाही साखरवाडी परिसरात मांज्याची विक्री व वापर सुरू असल्याने संबंधित यंत्रणेने तातडीने दुकाने व बाजारपेठांची तपासणी करावी. बंदी असलेल्या मांज्याची विक्री, साठवणूक आणि वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

एखादी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घातक मांज्याचा वापर पूर्णपणे थांबवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
To Top