Pune Crime l पुण्यात पोलिस निरीक्षकाला १० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; तोतया पत्रकारावर गुन्हा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
लोहमार्ग पोलिस मुख्यालयातील पोलिस निरीक्षकाला हॉटेलमध्ये बोलावून, त्यांच्या विरोधात बातमी प्रसिद्ध करून कारवाई तसेच नोकरी घालवण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित पोलिस निरीक्षकांविरोधात व्हॉट्सअॅपवर कथित खोटी बातमी प्रसिद्ध करून बदनामी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुज्जमिल शेख असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ या डिजिटल न्यूज चॅनेलचा मुख्य संपादक व संचालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी खडकी लोहमार्ग येथील राखीव पोलिस निरीक्षकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलिस दलाच्या शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात नियमित ड्रिल सराव होत असतो. या सरावाची माहिती शेख याने पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर त्याने संबंधित पोलिस निरीक्षकांना धमकावून शिवाजीनगर येथील हॉटेल प्राईड येथे ४ ऑगस्ट रोजी बोलावले.
हॉटेलमध्ये भेटीदरम्यान त्याने पोलिस निरीक्षकांना अर्धवट फोटो दाखवून, त्यावरून बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच, बातमी प्रसिद्ध करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करवून घेत नोकरी घालवतो, अशी धमकी देत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यानंतर पोलिस निरीक्षकांकडे १० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, फिर्यादीने धमकीकडे दुर्लक्ष करून पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर शेख याने आपल्या व्हॉट्सअॅपवर संबंधित पोलिस निरीक्षकांविरोधात बातमी प्रसिद्ध करण्याची हेडलाईन पाठवून पैसे देण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तरीही पैसे न दिल्याने संबंधिताने पोलिस निरीक्षकांविरोधात कथित खोटी बातमी प्रसिद्ध करून त्यांची बदनामी केली. तसेच, या बातमीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मुज्जमिल शेख याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. जाधव करत आहेत.
Tags
To Top