सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
वाढे (ता. सातारा) येथे कारच्या धडकेत अवघ्या सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी घडली. शिवार्थ मनोज नलावडे (रा. वाढे) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने नलावडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात रोहित सतीश नलावडे (वय २७, रा. वाढे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस रामचंद्र गोरे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित नलावडे हा एमएच ११ डीझेड २९०१ क्रमांकाची हॅरियर कार चालवत होता. वाढे येथील अरुंद रस्त्यावर तो बेदरकार व निष्काळजीपणे कार चालवत असताना कारची धडक शिवार्थ याला बसली. या अपघातात चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अपघातावेळी नेमके काय घडले, याची सुरुवातीला स्पष्ट माहिती मिळाली नव्हती. जखमी शिवार्थला त्याच कारमधून रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांशी चर्चा करून प्राथमिक माहिती घेतली. कारबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला.
दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अपघाताची घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सातारा तालुका पोलिस करीत आहेत.
