Pune News l पाल्यांचे शिक्षण, आजारपणाचा विचार; पुणे ग्रामीण पोलीस दलातील २५२ बदल्यांना मंजुरी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
उरुळी कांचन : प्रतिनिधी 
 पाल्यांचे शिक्षण, कुटुंबातील सदस्यांचे आजारपण, वैद्यकीय उपचार आणि इतर कौटुंबिक अडचणींमुळे बदलीच्या ठिकाणी अडचणींचा सामना करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व अमलदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी कर्मचाऱ्यांच्या विनंत्यांचा सकारात्मक विचार करत पुन्हा गॅझेट काढून तब्बल २५२ बदल्यांना मंजुरी दिली आहे.
यापूर्वी झालेल्या बदल्यांनंतर काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाल्यांच्या शैक्षणिक वर्षामुळे तसेच कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय उपचारांमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणात बदल करण्यासाठी प्रशासनाकडे विनंती अर्ज सादर केले होते.
कर्मचाऱ्यांच्या या अडचणींची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक गिल यांनी प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा बदल्यांची प्रक्रिया राबवली. त्यानुसार प्रशासकीय १३३, विनंती ५३ आणि अन्य ६६, अशा एकूण २५२ बदल्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि कामाचे स्वरूप अत्यंत आव्हानात्मक असते. त्यातच कुटुंबापासून दूर बदली झाल्यास पाल्यांचे शिक्षण, आजारी कुटुंबीयांची देखभाल आणि उपचार यांसारख्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. या बाबींचा विचार करून निर्णय घेतल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयाचे पोलीस अधिकारी व अमलदारांकडून स्वागत करण्यात येत असून, कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेणारे संवेदनशील नेतृत्व असल्याची भावना दलातील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक अडचणींना प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय पोलीस दलातील मनोबल वाढविणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रशासन आणि पोलीस दलातील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. बदलीनंतर निर्माण झालेल्या अडचणींची दखल घेत पुन्हा संधी देण्यात आल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलातील अनेक अधिकारी व अमलदारांनी समाधान व्यक्त केले आहे.
Tags
To Top