Purandar Breaking l उभ्या टॅंकरला दुचाकीची धडक; गुळुंचेच्या तरुणाचा मृत्यू : पालखी महामार्गावर वाल्हे येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
नीरा : प्रतिनिधी
पुणे–पंढरपूर पालखी महामार्गावर पिसुर्टी गावच्या हद्दीत कामठवाडी स्मशानभूमीजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला पाठीमागून दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात अभिजीत भगवान निगडे (वय ३८, रा. गुळुंचे, ता. पुरंदर) यांचा मृत्यू झाला. रविवारी (दि. ३०) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्याच्या डाव्या बाजूच्या दुचाकीच्या लेनमध्ये टँकर उभा करून ठेवण्यात आल्याने हा अपघात घडल्याचा आरोप असून, टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाला जीव गमवावा लागल्याची चर्चा आहे. 
         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत निगडे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच १२ झेड एफ ९०७१) घेऊन जेजुरीकडून नीरेकडे जात होते. पिसुर्टी गावच्या हद्दीतील पाटीलवाडा हॉटेलसमोर पालखी महामार्गावर डाव्या बाजूच्या दुचाकीच्या लेनमध्ये टँकर (एमएच ११ बीएल ५८५९) उभा होता. रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या मार्गात टँकर उभा करून ठेवल्याने दुचाकीस्वाराला त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीची टँकरला पाठीमागून जोरदार धडक झाली. 
      या अपघातात अभिजीत निगडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
To Top