Satara Breaking | एआय गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाला २७ लाख ४२ हजारांचा चुना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
सातारा शहरातील एका व्यावसायिकाला सोशल मीडियावरील जाहिरातीच्या माध्यमातून ‘एआय’मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तब्बल २७ लाख ४२ हजार ५०१ रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हर्षद शहा (वय ६४, रा. आयटीआय रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मे ते जुलै २०२६ या कालावधीत ही घटना घडली. शहा हे इन्स्टाग्राम पाहत असताना त्यांना ‘एआय’मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, अशी जाहिरात दिसली. त्यानंतर त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्यात आला. अधिक पैशांचा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले.
त्यानुसार शहा यांनी गुगल पे आणि आरटीजीएसच्या माध्यमातून वेळोवेळी पैसे पाठवले. सुमारे २८ लाख रुपये पाठवल्यानंतरही अपेक्षित परतावा मिळत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून मूळ रक्कम आणि परताव्याची मागणी केली. मात्र, त्यानंतर संशयितांशी संपर्क होणे बंद झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शहा यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
To Top