सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोलापूर : प्रतिनिधी
ट्रान्सपोर्टचा माल ठरलेल्या ठिकाणी न पोहोचवता परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बारामतीतून जेरबंद केले. आरोपीकडून सर्व मालासह आयशर टेम्पो आणि दोन मोबाईल असा एकूण २१ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
प्रतीक निंबाळकर (वय २६, रा. गोपाळवाडी, ता. दौंड, सध्या रा. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
फिर्यादी परवेज फेजअहमद मोहोळकर यांचा मालवाहतुकीचा व्यवसाय आहे. ३१ जुलै रोजी आरोपीने मालवाहतूक करण्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यासाठी त्याने दहा हजार रुपये भाडेही घेतले. त्यानंतर पाच लाख ५४ हजार रुपयांचा पीव्हीसी पॅनल पट्टीचा माल आयशर ट्रकमध्ये भरून विजयपूर, कर्नाटक येथे नेण्याचे ठरले होते. मात्र आरोपीने हा माल ठरलेल्या ठिकाणी न पोहोचवता परस्पर अपहार करून फसवणूक केली.
याप्रकरणी ३ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांनी तपास सुरू केला. पथकाने कुशलतेने तपास करत आरोपी प्रतीक निंबाळकर याला बारामती येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीकडून सर्व माल, आयशर टेम्पो आणि दोन मोबाईल असा एकूण २१ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी पंकज पारधे याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. प्रतीक निंबाळकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी दौंड आणि खोपोली येथे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर आणि सहायक पोलिस आयुक्त अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊराव बिराजदार, पोलिस निरीक्षक संगीता पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांच्या पथकाने केली.
