सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन पाटस मार्गे सुप्याकडे येणारी शालेय एसटी बस बुधवारी (दि. १६) सकाळी साडेसातच्या सुमारास सुपे घाटातील पहिल्या वळणावर पलटी झाली. या बसमध्ये सुमारे ६० ते ७० विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटस मार्गावरून कुसेगाव, पडवी आदी परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन बस सुप्याकडे येत होती. सुपे घाटातील पहिल्या वळणावर चढ चढत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस दोन पलट्या घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याअभावी खाली कोसळली.
या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती विद्या प्रतिष्ठान स्कूलचे प्राचार्य पाटील यांनी दिली.
पालकांकडून सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असुन या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, शालेय वाहतुकीच्या सुरक्षेबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बसची नियमित सुरक्षा तपासणी केली जाते का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
बसचे ब्रेक, इंजिन, टायर,हाॅर्न तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे. तसेच बसचा दररोजचा सुरक्षा अहवाल ठेवण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुपे घाटातील धोकादायक वळणावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही पालकांकडून होत आहे.
