Baramati Crime l जुन्या भांडणाचा राग! माळेगावात पेट्रोल पंपावर कोयत्याने हल्ला; तिघे जखमी, १२ ते १३ जणांवर गुन्हा

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
माळेगाव बु. येथील तावरे पेट्रोल पंपावर जुन्या भांडणाच्या कारणातून धारदार लोखंडी कोयत्याने तिघांवर हल्ला केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात सहा जणांसह अन्य ६ ते ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप दत्तात्रय जगताप (वय ४६, रा. अमरसिंह कॉलनी, माळेगाव बु.) हे आपल्या मित्रांसह तावरे पेट्रोल पंप येथे गप्पा मारत असताना आरोपी तेथे आले. यापूर्वी झालेल्या भांडणात अनिकेत धुमाळ याने मध्यस्थी करून भांडण सोडविल्याचा राग मनात धरून आरोपींनी हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपींनी हातात धारदार लोखंडी कोयते घेऊन जीवे मारण्याची धमकी देत संदीप जगताप, अनिकेत उदयसिंह धुमाळ (वय २७) आणि पृथ्वीराज अतुल निंबाळकर (वय २९) यांच्यावर कोयत्याने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर परिसरात नागरिक जमा झाल्याचे पाहून आरोपी मोटारसायकलीवरून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमींवर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना संदीप जगताप यांनी पोलिसांना जबाब दिला.
या प्रकरणी गणेश भोसले, शुभम मोरे, मयूर रामचंद्र शितोळे, प्रेम कांबळे, हर्षद रणधीर आणि भुमेश झेंडे यांच्यासह अन्य ६ ते ७ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्र अधिनियमाच्या कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा क्रमांक २६१/२०२६ असून दाखल अंमलदार पोलीस हवालदार पटारे आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळवे करीत आहेत.
To Top