बारामती हादरली..! झोपेतच गळा चिरून दोन महिलांची हत्या; बाबुर्डीत दुहेरी हत्याकांडाने खळबळ; माजी महिला सरपंचाचाही मृतांमध्ये समावेश

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : सचिन पवार
बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील शेरेवाडी परिसरात दोन ज्येष्ठ महिलांची झोपेतच गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर २०२६) सकाळी उघडकीस आली. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेत इंदुबाई मारुती लडकत (वय ७५, बाबुर्डीच्या माजी सरपंच) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ६५) यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला रात्री घराच्या ओसरीबाहेर झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने झोपेत असतानाच दोघींचा गळा चिरून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. सकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

इंदुबाई लडकत यांचा मुलगा बारामती तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या घटनेमागे नेमके कारण काय आहे, तसेच हत्येचा उद्देश कोणता होता, याबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तपास पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांकडून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. हत्येमागील कारण, आरोपींची ओळख आणि घटनेचे नेमके स्वरूप तपासातून स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, एका रात्रीत दोन ज्येष्ठ महिलांची हत्या झाल्याने बाबुर्डी परिसर हादरला असून नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. पोलिसांकडून या दुहेरी हत्याकांडाचा कसून तपास सुरू आहे.
To Top