सोमेश्वर रिपोर्टर टीम----
माळेगाव : प्रतिनिधी
पणदरे (ता. बारामती) येथे गरोदर महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्यानंतर दागिने लुटून नेणाऱ्या आरोपीला माळेगाव पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद केले.
या धडाकेबाज कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणदरे येथील रंजना लक्ष्मण पवार यांनी याबाबत माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांचा मुलगा तानाजी लक्ष्मण पवार व त्यांची पत्नी वैशाली तानाजी पवार हे दोघे त्यांच्यापासून विभक्त पणदरे एमआयडीसी परिसरात राहत होते. दरम्यान, तानाजी हा रोज कामावर गेल्यानंतर त्याच्या पत्नीला घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराला विरोध केल्याने आरोपीने वैशाली पवार यांना हातोड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विरोध सुरूच राहिल्याने आरोपीने टॉवेलच्या साहाय्याने तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली तपासादरम्यान दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील वैशाली पवार यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी पाठविण्यात आले. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
या प्रकरणात गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पणदरे, ता. बारामती) याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. त्याच्याकडून मृत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोर्ले व पायातील पैजण काढून नेल्याची माहितीही समोर आली.
तपासादरम्यान पीडित महिला गर्भवती असल्याचे तसेच तिच्या डोक्यात आणि मानेवर गंभीर दुखापती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला हातोडा, तसेच गुन्हा करताना अंगावरील कपडे आणि महिलेच्या गळ्यातील दागिने लपवून ठेवलेली ठिकाणे पोलिसांना दाखविल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदिपसिंग गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
