सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर विद्यालयात बुधवारी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या उपक्रमात विद्यालयातील तब्बल ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारल्या.
रासायनिक रंग व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचा आनंद घेतला. तसेच यापुढे घरीही शाडू मातीचीच गणेशमूर्ती बनविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
विद्यालयाचे कलाशिक्षक गायकवाड डी. व्ही. यांनी विद्यार्थ्यांना मोफत शाडू माती उपलब्ध करून देत मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी पी. आर. यांनी केले.
