सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामतीच्या कऱ्हा नदीवरील काशीविश्वेश्वर पुलाच्या आकर्षक प्रकाशयोजनेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, अमेरिकेतील ‘Light Justice Now’ अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘Award of Merit’ पुरस्काराने या प्रकाशयोजनेचा गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या जागतिक पुरस्कारासाठी निवड झालेल्या नऊ प्रकल्पांमध्ये बारामतीच्या नेहा राजकुमार दोशी या एकमेव भारतीय ठरल्या आहेत.
नेहा दोशी यांच्या ‘Canopy of Lights’ या संकल्पनेतून काशीविश्वेश्वर पुलाची प्रकाशयोजना साकारण्यात आली आहे. ही प्रकाशयोजना केवळ पुलाचे सौंदर्य वाढविणारी नसून, बारामतीची संस्कृती, परंपरा आणि नागरिकांच्या भावनांशी जोडणारा अनोखा प्रकाशानुभव निर्माण करणारी ठरली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मिळालेला आंतरराष्ट्रीय सन्मान हा बारामतीच्या विकासदृष्टीसोबतच स्थानिक प्रतिभेची जागतिक पातळीवर झालेली नोंद मानली जात आहे.
कऱ्हा नदीला येणाऱ्या पुराचा विचार करून कसबा परिसर ते श्रीमंत बाबूजी नाईक वाडा परिसराला जोडणारा पूल उभारण्याचा निर्णय तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून घेण्यात आला होता. या पुलाच्या प्रकाशयोजनेची जबाबदारी नेहा दोशी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांनी प्रकाशयोजनेसाठी स्वतः दिव्यांची रचना करून ते तयार करून घेतले.
या प्रकाशयोजनेचे सौंदर्य अजित पवार यांनाही विशेष भावले होते. स्थानिक गरजा, शहराची ओळख आणि आधुनिक प्रकाशतंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ या प्रकल्पात साधण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीतील काशीविश्वेश्वर पुलाची प्रकाशयोजना आता स्थानिक आकर्षणापुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय प्रकल्प म्हणून समोर आली आहे.
नेहा दोशी यांनी विद्या प्रतिष्ठानच्या विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर तसेच तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातून शिक्षण घेतले. त्यानंतर कमिन्समधून आर्किटेक्चरचे शिक्षण घेत त्यांनी दुबई येथे लाईटिंग डिझाईन क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविले.
काशीविश्वेश्वर पूल आज कऱ्हा नदीचे दोन किनारे जोडण्यासोबतच बारामतीची वेगळी ओळख अधोरेखित करणारा ठरत आहे. या प्रकाशयोजनेला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
