Baramati News l प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना महाराष्ट्र शासनाचा 'डॉ. जे. पी. नाईक आदर्श प्राचार्य पुरस्कार '

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने राज्य शासनाचा ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीचा 'डॉ. जे. पी. नाईक आदर्श प्राचार्य पुरस्कार' महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने तब्बल १४ वर्षांच्या खंडानंतर ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ पुन्हा सुरू करण्यात आला आहे. अत्यंत कठोर, पारदर्शक आणि गुणवत्ताधिष्ठित छाननी प्रक्रियेतून या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षक व आदर्श प्राचार्यांची निवड करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता, महाविद्यालयीन विकास, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग आणि प्रशासनातील प्रभावी योगदान अशा विविध निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण दिले पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि तर्कावर आधारित विज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षणासोबतच जीवनमूल्यांचे शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.”

पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे म्हणाले की, "हा सन्मान म्हणजे आपल्या शैक्षणिक कार्याची पावती आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी-केंद्रित आणि कौशल्याधिष्ठित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझ्या कार्यपद्धतीचा मूलमंत्र ‘Not Me, But You’ हा आहे. व्यक्तिकेंद्रित नेतृत्वापेक्षा सर्वांना सोबत घेऊन, प्रत्येकाला समान संधी देत सामूहिक सहभागातून काम करण्यावर माझा नेहमीच भर राहिला आहे. समाजातील सर्व घटकांना समान न्याय, समान संधी आणि सन्मान मिळावा, यासाठी यापुढील काळातही अधिक प्रभावीपणे प्रयत्नशील राहीन,” असे प्रतिपादन करून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाचे आभार मानले. यापूर्वीही डॉ. वायदंडे यांना झी गौरव अवॉर्ड, बेस्ट टीचर अवॉर्ड, बेस्ट प्रिंसिपल अवॉर्ड इ. पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या पुरस्कारामुळे मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्याला राज्यस्तरावर नवी ओळख मिळाली असून, महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

या कार्यक्रमास उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, डॉ. सागर देशपांडे यांच्यासह राज्यातील पुरस्कार विजेते शिक्षक, तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
To Top