बारामती l सावत्र बहिणीचे घर जाळणारा आरोपी बारामती पोलिसांच्या सापळ्यात

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
सावत्र बहिणीच्या घराला आग लावून जाळपोळ केल्याच्या गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेल्या राकेश उर्फ बिट्या गणेश गायकवाड याला बारामती शहर पोलिसांनी पहाटे सापळा रचून त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध न्यायालयीन वॉरंटही प्रलंबित होते. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जेल कस्टडी सुनावली.

बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. ३५०/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६(g), ३५१(१), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आरोपी पाहिजे होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा शोध सुरू असताना तो पोलिसांना मिळून येत नव्हता.
दरम्यान, आरोपीविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्र. २, बारामती यांच्या न्यायालयातील RCC क्र. ४५७/२०२० मध्येही वॉरंट प्रलंबित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याशिवाय त्याच्याविरुद्ध यापूर्वी विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीच्या हालचालींवर गोपनीय पद्धतीने लक्ष ठेवले जात होते. तो पहाटेच्या सुमारास राहत्या घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पहाटेच परिसरात सापळा रचला. योग्य वेळ साधून पोलिसांनी आरोपीला पळून जाण्याची संधी न देता घरातून ताब्यात घेतले.

राकेश उर्फ बिट्या गायकवाड याच्याविरुद्ध यापूर्वीही बारामती शहर व तालुका पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावर खंडणी, मारहाण, धमकी, जबरी चोरी, विनयभंग यांसह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याच्या पूर्वगुन्हेगारी पार्श्वभूमीची आणि प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांची स्वतंत्र छाननी केली जात आहे.
घर जाळपोळीसारख्या गंभीर प्रकाराकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहिले असून, आरोपीकडून भविष्यात पुन्हा कोणताही गंभीर गुन्हा घडू नये यासाठी त्याच्याविरुद्ध पुढील प्रतिबंधक कारवाईबाबत कायदेशीर परीक्षण करण्यात येणार आहे. आवश्यक निकष पूर्ण झाल्यास MPDA अथवा अन्य लागू प्रतिबंधक तरतुदींनुसार सक्षम प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही केली जाऊ शकते.

या कारवाईमुळे ‘गुन्हा करून लपून राहता येणार नाही’ असा स्पष्ट संदेश बारामती शहर पोलिसांनी दिला आहे. रेकॉर्डवरील, फरार तसेच पाहिजे आरोपींच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर असून न्यायालयीन वॉरंटची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस हवालदार उदय टापरे, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे व महिला पोलीस शिपाई भाग्यश्री देवकाते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
“महिलेच्या घरावर, जीवितावर किंवा मालमत्तेवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांकडे तक्रार करावी,” असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.
To Top