बारामती l लाचेचा डाव फसला! पाच लाख स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी 
झुंबा डान्स क्लास व जिमसंदर्भात आलेल्या तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी सात लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी दोन लाख रुपये यापूर्वी स्वीकारल्यानंतर उर्वरित पाच लाख रुपये स्वीकारताना बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार महेश अंकुश उगले (वय ३६, ब. नं. २६३७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने मंगळवारी (दि. ८) बारामतीत रंगेहात पकडले. पी.डी.सी.सी. बँकेजवळ, माळेगाव रोड येथे दुपारी ३.०२ वाजता ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराच्या पत्नीकडून झुंबा डान्स क्लास व जिम चालविण्यात येत आहे. या क्लासमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी क्लास तसेच तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध कारवाई करण्याबाबत अर्ज केला होता. हा अर्ज चौकशीसाठी पोलिस हवालदार महेश उगले याच्याकडे प्राप्त झाला होता.  या अर्जावरून कारवाई न करण्यासाठी उगले याने तक्रारदाराकडे सात लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ७ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने त्याच दिवशी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या वेळी पंचासमक्ष झालेल्या पडताळणीत उगले याने सात लाख रुपयांच्या लाचेबाबत चर्चा केल्याचे, यापूर्वी दोन लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य केल्याचे आणि उर्वरित पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नमूद केले आहे. त्यानंतर मंगळवारी सापळा रचण्यात आला. त्यावेळी उगले याने तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारली. ही रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले.

 या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलिस हवालदार प्रवीण तावरे, पोलिस कॉन्स्टेबल आश्विन कमकर व चालक पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.
To Top