Bhor News l रायरेश्वरावरील शंभू महादेव मंदिराला गळती; ८२ लाखांच्या डागडुजीवर प्रश्नचिन्ह! शिवप्रेमींच्यात नाराजी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर गडावरील शंभू महादेवाच्या मंदिराच्या गाभाऱ्यावरील डागडूजीचे काम निकृष्ट पध्दतीने पुरातत्व विभागाने केले असल्यामुळे मंदिरात पाण्याची गळती होऊन मंदिरात पाणी साचत असल्यामुळे पर्यटक,शिवप्रेमी,ग्रामस्थ यांना शंभू महादेवाच्या शिवलींगाचे दर्शन घेताना ञास सहन करावा लागत आहे.दरम्यान पुरातत्व विभागावर शिवप्रेमींनी तसेच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
      पुरातत्व विभागाच्या माध्यमातून रायरेश्वर गडावरील शंभू महादेवाच्या मंदिराचे डागडूजीचे काम १३ जानेवारी २०२५ पासून सुरू करण्यात आले होते. या कामासाठी शासनाने ८२ लाख रुपये निधी मंजूर केला होता. हे काम साधारण तीन महिने सुरू असल्याकारणाने मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात आले होते.३ एप्रिल २०२५ रोजी पुरातत्व विभाग,स्थानिक ग्रामस्थ,शिवप्रेमी यांच्या सहभागातून मंदिराच्या झालेल्या कामाचा जिर्णोध्दार करण्यात आला. परंतु या कामास साधारण दोन वर्ष झाले असतानाच पुरातत्व विभागाने काम निकृष्ठ दर्जाचे केले असल्याने आता शंभू महादेवाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात भर पावसाळ्यात गळती लागली आहे. मंदिरात पावसाचे पाणी साठत असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी मंदिराच्या छतावर कागदी ताडपञी टाकून पाण्याच्या गळती पासून बचाव केला आहे. 

श्री क्षेत्र रायरेश्वर हे असंख्य शिवप्रेमी, भाविक आणि पर्यटकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. मागील चार-पाच वर्षांत येथे मोठ्या प्रमाणात नागरिक व पर्यटक दर्शनासाठी येत आहेत.मात्र मंदिरामध्ये पावसाचे पाणी गळताना पाहून भाविकांच्या भावना दुखावतात. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंदिराचे काम झाले पण काम पूर्ण झाल्यानंतरही समस्या कायम राहणे ही अत्यंत खेदाची बाब असल्याची भावना शिवप्रेमीनी व्यक्त केली.पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन, संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांनी या विषयाची तातडीने दखल घेऊन कामाची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.
                                         
Tags
To Top