सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत ऊर्फ मधुकर गणेश बोकिल यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने बारामती तालुक्याच्या ग्रामीण पत्रकारिता क्षेत्रातील एक ज्येष्ठ, संवेदनशील आणि समाजभान जपणारा पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
मधुकर बोकिल हे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत होते. मात्र, शिक्षकी पेशाबरोबरच त्यांनी लेखणीशी असलेले नाते अखेरपर्यंत जपले. सन १९६० पासून त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये पत्रलेखनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध सामाजिक समस्या, अडचणी आणि जनतेचे प्रश्न सातत्याने मांडण्यास सुरुवात केली. पुढे दैनिक केसरी, तरुण भारत आदी वर्तमानपत्रांत बातमीदार म्हणून त्यांनी प्रदीर्घकाळ पत्रकारिता केली.
बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील जुन्या पिढीतील पत्रकार म्हणून त्यांची विशेष ओळख होती. गावातील छोट्या-मोठ्या प्रश्नांकडे केवळ बातमी म्हणून न पाहता, त्या प्रश्नामागील माणूस आणि त्याची अडचण समजून घेऊन ती प्रशासन आणि समाजासमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. शिक्षण क्षेत्रातून विद्यार्थ्यांची जडणघडण आणि पत्रकारितेतून समाजप्रबोधन, अशा दुहेरी माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली.
साधी राहणी, स्पष्टवक्तेपणा आणि सामाजिक बांधिलकी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामीण पत्रकारितेच्या वाटेवर अनेक वर्षे प्रामाणिकपणे प्रकाश टाकणारी त्यांची लेखणी थांबली असली, तरी त्यांच्या कार्याच्या आठवणी सदैव जिवंत राहतील.
