सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वेल्हे : प्रतिनिधी
वेल्हे बाजारपेठेत गहाळ झालेला सोन्या-चांदीचा ऐवज तसेच विविध महत्त्वाची कागदपत्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने शोधून काढत वेल्हे पोलिसांनी संबंधित महिलेला परत केली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे महिलेने आभार मानत कौतुक केले.
याबाबत शैला दत्तू बलकवडे (वय ५५, रा. कुंबळे, ता. भोर, जि. पुणे) यांनी दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी वेल्हे बाजारपेठेत आपला सोन्या-चांदीचा ऐवज तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याची वर्दी वेल्हे पोलीस ठाण्यात दिली होती.
गहाळ झालेल्या वस्तूंमध्ये सोन्याची दोन कानातील फुले, गळ्यातील बदामाच्या आकाराची दोन पाने, मुलांच्या चांदीच्या दोन पट्ट्या, मुलांच्या चांदीच्या दोन अंगठ्या, पीडीसीसी बँकेची दोन पासबुक, आयुष्मान भारत कार्ड, पोस्टाचे कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड तसेच सोन्याचे लहान दोन जोड कानातले यांचा समावेश होता.
महिलेने दिलेल्या तक्रारीची दखल घेत वेल्हे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. बाजारपेठेतील उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी गहाळ मुद्देमालाचा शोध घेतला. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आणि गहाळ झालेला सर्व मुद्देमाल शोधून काढण्यात आला.
दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी वेल्हे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राऊत (क्र. २४७८), चालक पोलीस शिपाई कदम (क्र. ५४) आणि पोलीस शिपाई पाटील (क्र. २५४१) यांनी हा सर्व मुद्देमाल संबंधित महिलेच्या ताब्यात सुपूर्द केला.
सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे परत मिळाल्याने शैला बलकवडे यांनी वेल्हे पोलिसांचे आभार मानले. सीसीटीव्हीच्या मदतीने तातडीने तपास करून गहाळ मुद्देमाल परत मिळवून देणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.
वेल्हे पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तूंचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे.
