Satara News l महावितरण कंपनीच्या बारामती परिमंडळात ‘अनागोंदी’चा आरोप; चार वरिष्ठ अभियंत्यांच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बारामती परिमंडळांतर्गत वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणात अनागोंदी व गैरकारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या गैरकारभारामुळे महावितरण कंपनीचे लाखो ते कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करत बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, सातारा मंडलचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हाळनोर, सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित बारटक्के आणि वडूज विभागाचे कार्यकारी अभियंता भीमराव म्हस्के यांच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष सागर संभाजी बर्गे, शेतकरी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शिर्के, शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते रावळेश्वर घोरपडे आणि मधुकर चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित चारही अधिकाऱ्यांना तात्काळ अकार्यकारी पदावर बदली करावी आणि चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने कामकाज होत असून कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. लेखी स्वरूपात पुराव्यांसह तक्रारी करूनही संबंधित अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंत्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे.
सातारा मंडलचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हाळनोर यांच्या कार्यपद्धतीवरही निवेदनात तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांचे कार्यालय तसेच सातारा विभागीय कार्यालय काही ठेकेदारांचे ‘खासगी संपर्क कार्यालय’ बनल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागूनही माहिती दिली जात नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

एनएससी कामांपासून देखभाल-दुरुस्तीपर्यंत चौकशीची मागणी
सन २०२० पासून अर्जाच्या दिनांकापर्यंत सातारा व वडूज विभाग तसेच संबंधित मंडळ, उपविभाग व शाखा कार्यालयांतर्गत न्यू सर्व्हिस कनेक्शन (NSC) योजनेत मंजूर व कार्यान्वित करण्यात आलेल्या सर्व कामांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांनी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना सुमारे १५ लाख रुपयांपर्यंत काम करण्याची अनुमती असताना, महावितरण कंपनीच्या नियमांना हरताळ फासून सुमारे ३० ते ४० लाख रुपयांची कामे करण्यास अनुमती अथवा आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच डिस्ट्रीब्युशन बॉक्स बदलणे, देखभाल-दुरुस्तीची कामे आणि निधी वाटप या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व तफावत असल्याचा दावा करत या सर्व बाबींची कागदपत्रांसह तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वडूज विभागातील PF-ESI प्रकरण पुन्हा ऐरणीवर
वडूज विभागाचे कार्यकारी अभियंता भीमराव म्हस्के यांच्या कार्यकाळातील बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंड (PF), कर्मचारी राज्य विमा (ESI) आणि व्यवसाय कर (PT) संदर्भातील गंभीर अनियमिततेचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणात संपूर्ण यंत्रणा चौकशी प्रक्रियेत दोषी आढळूनही संबंधितांवर नाममात्र कारवाई करून प्रकरणातून सोडून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे

तसेच सर्व्हिस कनेक्शनअंतर्गत २५ अनधिकृत कृषी पंप रोहित्रे बसविण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणातील चौकशी समितीतील सदस्य बदलण्यामागील कारणांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात बाळासाहेब हाळनोर आणि धर्मराज पेठकर यांची भूमिकाही तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय DDF योजनेतील शेतीपंप रोहित्रांना देण्यात आलेल्या अनधिकृत मंजुरी, सुमारे ६० कोटी रुपयांच्या देखभाल-दुरुस्ती कामांचा निधी आणि २२ के.व्ही. रोहित्र दुरुस्ती प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सातारा मंडलाच्या अधिपत्याखालील सातारा, कराड, वाई, फलटण आणि वडूज येथील कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता आणि शाखा अभियंता यांच्या नियतकालिक, विनंती, प्रशासकीय व विशेष बदल्यांबाबत मुख्य अभियंता, बारामती परिमंडळ यांच्याकडे करण्यात आलेला संपूर्ण पत्रव्यवहार, प्रस्ताव, शिफारसी, टिपणे, अभिप्राय, नोंदी आणि संचिका तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
एकाच ठिकाणी सुमारे सात वर्षांपेक्षा अधिक काळ सहाय्यक अभियंता कार्यरत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला असून, त्यांच्या धर्मपत्नीही त्याच कार्यालयीन आवारातील अन्य कार्यालयात वर्षानुवर्षे कार्यरत असल्याचे नमूद करत या बाबीचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी समितीची मागणी
या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी औंढेकर यांच्यासारख्या दर्जेदार व कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या अथवा भारतीय प्रशासन सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी समिती स्थापन करावी, अशी आक्रमक मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे. समितीला विशेष अधिकार देऊन चौकशीसाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी, अशीही मागणी आहे.
चौकशीवर कोणताही प्रभाव पडू नये किंवा चौकशीच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी धर्मराज पेठकर, बाळासाहेब हाळनोर, अमित बारटक्के आणि भीमराव म्हस्के यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्काळ अकार्यकारी पदावर बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आवश्यक कागदपत्रे व पुरावे शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीसमोर सादर करण्यास आपण तयार असल्याचे सागर संभाजी बर्गे, अनिल शिर्के, रावळेश्व

 घोरपडे आणि मधुकर चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाही पुराव्यांसह निवेदन देण्यात येणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मकरंद आबा पाटील यांच्याकडेही निवेदन देऊन ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले आहे.

महावितरणमधील या कथित गैरकारभाराची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी; अन्यथा या प्रकरणाचा पाठपुरावा अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे.
To Top