सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : प्रतिनिधी
“ईश्वरी सत्ता कर्मरूपाने जन्माला आली की त्याला जीव म्हणतात, ज्ञानरूपाने जन्माला आली की देव म्हणतात आणि प्रेमरूपाने जन्माला आली की त्याला संत म्हणतात. ज्ञानरूपाने जन्माला आलेले भगवान श्रीकृष्ण हे ज्ञान, प्रेम आणि भक्तीचे प्रतीक आहेत,” असे प्रतिपादन हभप प्रमोद महाराज जगताप यांनी केले.
सुपे (ता. बारामती) येथील ऐश्वर्य विठ्ठल मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात शुक्रवारी रात्री श्रीकृष्ण जन्मावर कीर्तन करताना हभप जगताप बोलत होते. यावेळी विणावादन, काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन व हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री बारा वाजता फुलांची उधळण करीत श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाळणा गीते व अभंगांचे गायन करण्यात आले.
यानंतर उपस्थित भाविकांना सुंठवडा व मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. शनिवारी सकाळी हभप प्रमोद महाराज जगताप यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
