बारामती l सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचे बिगुल वाजले; ११ ऑक्टोबरला मतदान, १२ ऑक्टोबरला मतमोजणी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगरच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर १२ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. 
निवडणूक कार्यक्रमा नुसार ७ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ११ सप्टेंबर आहे. १५ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. त्यानंतर १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.

कारखान्याच्या निवडणुकीत उत्पादक सभासद प्रतिनिधींसाठी विविध गटांनुसार जागा निश्चित करण्यात आल्या असून, वर्गवारीनुसार महिला राखीव प्रतिनिधी तसेच इतर राखीव प्रवर्गांचाही समावेश आहे. एकूण २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे निवडणूक कार्यक्रमातून स्पष्ट होत आहे. 

११ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून, मतदानाचे ठिकाण निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत जाहीर केले जाणार आहे. मतदानानंतर १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल आणि मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सोमेश्वर कारखान्याच्या राजकीय हालचालींना आता वेग येण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवार आणि विविध गटांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे.
To Top