Phaltan News l कापशीनजीक अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ६७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
कापशी (ता. फलटण) गावच्या हद्दीत टाकूबाईचीवाडी ते कापशी मार्गावर अज्ञात वाहनाने लुना एक्सेलला जोरदार धडक दिल्याने ६७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. धडक देऊन अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगवान जगदेवराव झणझणे (वय ६७, रा. सासवड, ता. फलटण) हे ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लुना एक्सेल (एमएच ५३ डी ९८२१) वरून टाकूबाईचीवाडी ते कापशी मार्गावरून जात होते. कापशी गावच्या हद्दीत काळंगे यांच्या वस्तीसमोर अज्ञात वाहनावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवत त्यांच्या लुना एक्सेलला जोराची धडक दिली. या अपघातात भगवान झणझणे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पसार झाला.

याबाबत विजयकुमार निवृत्ती झणझणे (वय ५४, रा. सासवड, ता. फलटण) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५ (अ)(ब) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बनकर तपास करीत आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
To Top