सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शेतातून जाणाऱ्या महावितरणच्या वीजवाहक तारांना पडलेल्या अतिरिक्त झोळांमुळे तसेच ट्रान्सफॉर्मरमध्ये होणाऱ्या स्पार्किंगमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी आणि भविष्यात ऊस जळीताच्या घटना रोखण्यासाठी महावितरणकडून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या वीजवाहक तारांना अनेक ठिकाणी अतिरिक्त झोळ पडलेले आहेत. त्यामुळे वीजवाहक तारा पिकांना लागून जात असून तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पिकांमध्ये पडतात. परिणामी शेतकऱ्यांनी कष्टाने उभे केलेली पिके जळून खाक होत आहेत. काही ठिकाणी महावितरणचे ट्रान्सफॉर्मरही शेतातील उभ्या पिकांमध्ये उभारण्यात आले असून, त्यामध्ये स्पार्किंग होऊन पिके जळण्याच्या घटना घडत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
श्री सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील वडगाव, मुढाळे, मुरूम, नीरा, करंजे आणि वाणेवाडी परिसरात मागील महिनाभरात ऊस जळीताच्या घटना घडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, अद्याप ठोस सुधारणा झालेली नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील मागील दोन वर्षांपासून नुकसानभरपाईची १४ प्रकरणे महावितरण कंपनीकडे प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नसल्याने या प्रकरणांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय किसन सोनवलकर, अधीक्षक अभियंता दिपक सबाजी लहामगे आणि उपकार्यकारी अभियंता अरविंद अंभोरे यांना प्रलंबित नुकसानभरपाईची प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच भविष्यात ऊस जळीताच्या घटना होऊ नयेत यासाठी महावितरणकडून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी नम्र विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
